
पुणे पुन्हा एकदा हादरले ! ३२ वर्षाच्या महिलेचे अपहरण करुन कर्जतच्या जंगलात अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी पती पत्नीवर गुन्हा दाखल
पुण्यातील महिलेचे अपहरण करुन तिला कर्जतमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर तिला कर्जतच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी ३२ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३६ वर्षाचा पुरुष आणि ३२ वर्षाची महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे व कर्जत येथील जंगलात ६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सहकारनगर भागात राहतात. आरोपी पती पत्नी असून त्यांच्याजवळच राहतात. महिलेने फिर्यादी यांना आपल्या घरी नेऊन हाताने मारहाण करुन डांबून ठेवले. त्यानंतर ३६ वर्षाच्या पुरुषाने बळजबरीने त्याच्या गाडीत बसवून कर्जत येथे नेवून तेथे दोन दिवस हॉटेलमध्ये ठेवले. नंतर जंगलात नेऊन फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून फिर्यादीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला फिर्यादीने विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या मोबाईलवरील फोन पे चा पासवर्ड घेऊन त्यांच्या अकाऊंटमधील ७१ हजार रुपये काढून घेतले. पुण्यात आल्यानंतर आता त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.