![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची पोलीसांनी काढली धिंड
धिंड काढतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलीसांच्या कृतीचे नागरिकांकडून स्वागत, अद्दल घडणार?
पुणे – पुणे शहर आणि परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पण आता पोलीसांनी तोडफोड करणाऱ्या गँगची धिंड काढत दहशत निर्माण करणाऱ्या टवाळखोरांना इशारा दिला आहे.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर, आई माता मंदिर, अप्पर डेपो, सोळा एकर, दुर्गामाता गार्डन, तय्यबा मस्जिद मेन रोड, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची हातात धारदार शस्त्र घेऊन तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी एकूण ५० वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांही आरोपींना वेल्हा तालुक्यातून पाबे घाटातून ताब्यात घेतले असून बिबवेवाडी परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. अभिषेक पांढरे, गणराज सुनील ठाकर असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पांढरे, ठाकर व एक अल्पवयीन मुलगा दुचाकीवर ट्रिपल सिट आले होते, त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती. अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री आलेल्या व रस्त्या च्या कडेला लावलेल्या दुचाकी, टेम्पो, रिक्षांची धारदार शस्त्राने व दांडक्याने तोडफोड केली. टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. पण नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांनी पळ काढला होता.
आरोपींनी ज्या मार्गावर गाडयांची तोडफोड केली होती. त्याच मार्गावर बिबवेवाडी पोलिसांनी तीनही आरोपींची धिंड काढली आहे.अशाप्रकारे धिंड काढून इंगा दाखवला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. या कारवाईची आता सर्वत्र चर्चा होत आहे.