
गणेश उत्सवात यंदा ‘आवाज वाढव डीजे’
गणेश उत्सवात 'या' वेळेपर्यंत मिळाली ध्वनिक्षेपक सुरु ठेवण्याची परवानगी
पुणे दि ३ (प्रतिनिधी)- पुणे शहर आणि परिसरातील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेश उत्सवात मंडळांना शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे आणि ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे,अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.यामुळे गणेश मंडळ आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दाै-यावर आले होते. यावेळी शहरातील गणेश मंडळातील पदाधिका-यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी मंडळांनी आपले मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘उत्सवातील शेवटचे पाच दिवस बारा पर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी असेल, गणेश मंडळांना मंडप टाकण्याची परवानगी लवकरात लवकर मिळेल. त्याचबरोबर तात्पुरते वीजमीटर बसविण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालावे. सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा.’ तसेच मंडप टाकण्याचे शुल्कही माफ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. गणेश विसर्जनादिवशी रात्री बारानंतर सर्व ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद राहील, दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजल्यानंतर स्पीकर वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. पथारी व्यावसायिकांनी हटवू नका असाही आदेश शिंदे यांनी बैठकीत दिला आहे.
नियमाचे उल्लंघन करणा-यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे दोन वर्ष साध्या पद्धतीने पार पडलेला गणेश उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. आता बारा पर्यंत डीजेचा आवाज घुमणार असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.