
रीलस्टार पत्नीने केली गळा आवळून पतीची हत्या
सोशल मिडिया ठरला हत्येचे कारण, पतीच्या त्या त्रासला कंटाळून पत्नीचे निर्दयी कृत्य, कारण काय?
भोपाळ – अलिकडे सोशल मिडियाने आपल्या जीवनातील मोठा वेळेवर कब्जा केला आहे. इतकेच नाहीतर अनेकांना सोशल मिडियाचे व्यसनच लागले आहे. या सोशल मिडियामुळे पत्नीने पतीची हत्या केली आहे.
सुरेश बैगा असे पतीचे नाव आहे तर राधा कोल असे पत्नीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, सुरेश आणि राधा या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. फेसबुकद्वारे दोघांची मैत्री झाली होती. २१ एप्रिल रोजी दोघांमध्ये रिल्सच्या लाइकवरून वाद झाला. या वादात राधाने गळा दाबून सुरेशचा खून केला. मात्र राधाने पोलिसांना खोटी माहिती दिली. तिने सांगितले की, सुरेश खूप दारू पिऊन आला. तो धड जेवलाही नाही आणि आता तो उठत नाही. शेजाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुरेशचा मृत्यू झाल्याचे समजले. पोलिसांना मृताच्या गळ्यावर नखांचे ओरखडे दिसल्याने खूनाचा संशय बळावला. त्यानंतर सुरेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संशयाच्या आधारे पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. ति म्हणाली की, पहिल्या नवऱ्यापासून तिला ५ वर्षांची मुलगी आहे. पहिला पती खूप त्रास देत होता. त्यामुळे ती माहेरी राहायला आली. याच काळात फेसबुकवर तिची ओळख सुरेशशी झाली. तो तिचे रील्स लाइक करत होता. त्यांच्यात आधी मैत्री निर्माण झाली आणि नंतर ते एकमेकांवर प्रेम करु लागले. सुरेशने त्याचे एक लग्न झाल्याचे राधाला सांगितले होते. दोघे आधी लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते. काही दिवसांनी त्यांनी लग्न केले. लग्नानंतर सुरेश तिच्यावर सतत संशय घेऊ लागला. तिच्या रील्सवर कोणत्याही पुरुषाने लाईक केलं तर तो राधावर रागवायचा आणि तिला शिवीगाळ करायचा. तसेच त्याने मुलीवरही हात उगारला, त्यामुळे आपण सुरेशची हत्या केल्याचे राधाने सांगितले.
डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी राधाला ताब्यात घेतले. तेव्हा तिने गुन्हा कबूल केला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब आणि रिल्समुळे एका संसाराचा शेवट झाला आहे.