
मुंबई : आरटीओ चलनाची एपीके फाईल पाठवून बँक खात्याचे अॅक्सेस मिळवले आणि एका व्यापार्यासह त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर ठगाने तब्बल 21 लाख 71 हजार रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षांचे तक्रारदार मालाड येथे राहत असून तक्रारदाराचा त्यांच्या भावासोबत व्यवसाय आहे. 1 डिसेंबरला ते त्यांच्या बँकेत कामानिमित्त गेले होते. त्यावेळी तक्रारदाराने स्वत:चे आणि आपल्या पत्नीचे बँक खात्याचे पासबुक अपडेट करण्यासाठी दिले होते. यावेळी त्यांना त्यांच्या बँक खात्यातून 11 लाख 33 हजार 880, तर त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून 10 लाख 39 हजार 326 असे एकूण 21 लाख 71 हजार 782 रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तक्रारदाराने बँक मॅनेजरशी चर्चा केली. त्यानंतर मॅनेजरने तक्रारदाराच्या बँक खात्याचे स्टेटमेंट मागवून घेतले. बँक स्टेटमेंटमध्ये तक्रारदारासह त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाइन व्यवहार झाल्याचे दिसून आले. हा सायबर फ्रॉड असल्याचे लक्षात येताच मॅनेजरने तक्रारदाराला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तक्रारदाराने स्थानिक पोलिसांसह उत्तर सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक तपासात तक्रारदाराच्या व्हॉटअपवर 17 नोव्हेंबरला एक आरटीओ चलनाची फाईल आल्याचे दिसून आले. या फाईलचे निरीक्षण केल्यानंतर ती एपीके फाईल होती आणि तक्रारदाराने ती फाईल डाऊनलोड केल्याचे लक्षात आले. त्यानंतर अज्ञात सायबर ठगाने त्यांचा मोबाइल हॅक करून तक्रारदारासह त्यांच्या पत्नीच्या बँक खात्याचे अॅक्सेस प्राप्त केले आणि दोन्ही बँक खात्यातून तब्बल 21 लाख 71 हजार 782 रुपयांचा परस्पर अपहार करून तक्रारदाची फसवणूक केल्याचे लक्षात आले आहे. याप्रकरणी आता पोलीस ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह अज्ञात सायबर ठगाची माहिती काढत आहे. लवकरच संबंधित आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


