
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मस्साजोग येथील ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ०७ ते १३ एप्रिल या दरम्यान अर्ज भरले जाणार आहेत. तर १५ एप्रिल रोजी या अर्जांची छाननी केली जाणार आहे. १७ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. तर, २८ एप्रिल रोजी मतदान होऊन निकाल २९ एप्रिल रोजी लागणार आहे. मस्साजोगचा नवा सरपंच कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेच गावचा कारभार हाती घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, आता मस्साजोगच्या सरपंचपदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देशमुख कुटुंबीयांनी एकमताने ग्रामस्थांशी चर्चा करून अश्विनी देशमुख यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. अश्विनी देशमुख आपला उमेदवारी अर्ज अगदी साध्या पद्धतीने दाखल करणार आहेत.

दरम्यान, नव्याने गावचा कारभार हाती घेणाऱ्या नवीन सरपंचांचा कालावधी १८ महिने इतका असणार आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध सरपंच पद द्यावे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरपंच पद देणे हीच संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता ही निवडणूक बिनविरोध होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

