
सतीश भोसले उर्फ खोक्याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण
पाठीवर वळ असलेले फोटो व्हायरल, कराडनंतर 'खोक्या'ला कोठडीत मारहाण; बीड जिल्ह्यात चाललंय काय?
बीड – बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. सतीश भोसलेला वन विभागाच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी ही मारहाण करण्यात आली आहे.
बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खोक्याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाली. खोक्याच्या वकिलाने हा दावा केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खोक्याला गुरूवारी दुपारी वन विभागाने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला वन विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. याच कोठडीत त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलाने सतीश भोसले याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून पुन्हा एकदा खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याला वन विभागाच्या कोठडीत कोणी मारहाण केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात येणार असल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले. खोक्याला मारहाण करून त्याचे डोके बर्फाच्या पाण्यात बुडवण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला काही जणांचे नाव घेण्याची बळजबरी देखील केली, असे खळबळजनक आरोप शशिकांत सावंत यांनी केला आहे. दरम्यान, मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर खोक्याचे मेडिकल केल्यानंतर ही मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खोक्याला मारहाण झाल्यानंतर त्याच्या वकिलाने त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी मान्य करण्यात आली त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खोक्या भोसले चांगलाच चर्चेत आला होता. त्याचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या राहत्या घरी वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये वन्य प्राणी पकडण्यासाठी लागणारे जाळी, वन्य प्राण्यांच्या शिकार करण्यासाठी लागणारे हत्यारे त्याचबरोबर मांस आढळून आले होते. या प्रकरणी वनविभागाने सतीश भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती वन कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.