नाशिकसाठी शनिवार ठरला आगीचा वार
गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, गॅसच्या स्फोटाचे व्हिडिओ व्हायरल
नाशिक दि ८ (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यात मागील काही तासांपासून दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. दोन बसला आग लागल्यानंतर, आणखी एक अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच पुणे-इंदौर महामार्गावर घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे.
त्यामुळे नाशिकसाठी शनिवार आगवर ठरला आहे.
या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. एका ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे २०० सिलेंडर होते. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती.पण सिलेंडरचे सतत स्फोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. या स्फोटामुळे चालक जखमी झाला असून कोणतीही जिवितहानी झाली नाही.
नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद मार्गावरील मिरची चौकामध्ये बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसला आग लागली या आगीमध्ये १४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता तर वणीला जाणाऱ्या बसलाही अपघात झाला होता.