
‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका ; अंधारेंच्या टीकेवर सयाजी शिंदेंचा पलटवार म्हणाले…
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. सयाजी शिंदेंच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर समाजमाध्यमातूनही टीका करण्यात येऊ लागली.
विशेष म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही सयाजी शिंदेंचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली. सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला असे त्यांनी म्हंटले आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘ कायम खलनायक भूमिका करणारे सयाजी शिंदे आमच्यासाठी नायक होते. मात्र, आता खलनायकी विचारधारेसोबत गेले, त्यांनी गुलिगत धोका दिला’, असे म्हणत सुषमा अंधारेंनी निशाणा साधला. यावरून आता सयाजी शिंदे यांनी अंधारेंवर पलटवार केला आहे.
मला जी भूमिका पटली ती मी घेतली. आता काही जणांना ती खलनायकी वाटत असेल त्याकडे मी लक्ष देणार नाही.यात न पडलेलं बरं, वयाची पासष्टी आली आहे. आतापर्यंतचे माझे निर्णय मीच घेतलेले आहेत. मी घेतलेला निर्णय योग्य आहे, हे तुम्हा सर्वांना लवकरच कळेल’, असेही सयाजी शिंदे यांनी म्हंटले आहे.