
भीतीदायक! सराईत गुन्हेगाराचा मैत्रीणीवर गोळीबार
जामिनावर बाहेर आलेल्या तेजाचे कृत्य, अजून दोघांना मारण्याचा इरादा, या कारणाने राखीवर गोळीबार
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री एक थरारक गुन्हा घडला. नुकताच हर्सूल कारागृहातून सुटलेला कुख्यात गुंड सय्यद फैजल उर्फ तेजा याने स्वतःच्या मैत्रिणीवर गोळीबार केला. विशेष म्हणजे, जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याच मैत्रीणीने त्याचे स्वागत हार घालून केले होते. त्यामुळे खळबळ उडाली.
सय्यद फैजल हा शहरातील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर बलात्कार, शस्त्रसाठा, ड्रग्स तस्करी यांसारखे १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो हर्सूल कारागृहातून सुटला होता. सुटकेनंतर काही दिवसांनीच त्याच्याकडून ही गंभीर घटना घडली. दरम्यान सोमवार दि.११ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तेजा हा बेगमपुरा परिसरात होता. बेगमपुरात त्याने नशेत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो किलेअर्क परिसरात मैत्रिणीच्या घरात गेला. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. याचवेळी तेजाने थेट पिस्तूल काढत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावून आले. यावेळी तेजा घरातून पसार झाला होता. सध्या मुलीवर संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या मैत्रिणीचे नाव राखी मुरमरे असे आहे. या सराईत गुन्हेगारावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हेच नाही तर अल्पवयीन मैत्रिणीवर त्याने यापूर्वी बलात्कार केला होता. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी सय्यद फैजल उर्फ तेजाला तात्काळ अटक केली आहे. पोलिस घेऊन जात असताना त्याने कॅमेऱ्याकडे पाहून हातवारे केले आणि चक्क अजून दोन मुलींवर गोळीबार करणार असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी पोलिसांकडून त्याची धिंड देखील काढण्यात आली होती. पोलिसांचे दुर्लक्ष व त्यांना गांभीर्य नसल्यानेच कुख्यात गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.