
भीतीदायक! हे शहर गोळीबारच्या घटनेनी हादरले
गोळीबार करणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, नगरसेवक हत्याकांडाशी आहे कनेक्शन
जळगाव – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारी विश्वातून अनेक बातम्या समोर येत आहेत. कोयता गँग, खून, मारामारी, गोळीबार अशा घटना वाढल्या आहेत. त्यातच आता जळगावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार करण्यात आला आहे. शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केला आहे. बाळू मोरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सुमित भोसले यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला आहे. जुन्या वादातून दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला असावा असा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, गोळीबार केल्यानंतर ६ संशयित आरोपी घटनास्थळावरून तीन दुचाकीवरून फरार झाले. पण पोलीसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना संशयिताच्या घरातून काही घातक शस्त्रे आणि जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या गोळीबारच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मागील वर्षी भाजपचे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे उर्फ बाळू मोरे यांची हत्या करण्यात आली होती. ज्याच्या घरासमोर गोळीबार झाला, तो सुमित भोसले हत्या प्रकरणातील संशयित आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.