कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून या नेत्याचा नावावर शिक्कामोर्तब?
शपथविधीची तारीख ठरली, शपथविधीला विरोधी गटाच्या सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण
बेंगलोर दि १५(प्रतिनिधी)- कर्नाटकात भाजपाचा पराभव करत सत्तेत आलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण हा तोटा सुटला असुन कर्नाटकातही भाजपाने इतर ठिकाणचा कित्ता गिरवत जेष्ठ नेत्याला प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर नवीन नेतृत्वाचाही सन्मान केला जाणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेस हायकमांडने बुजुर्ग नेते सिद्धरमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदासह महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिवकुमार याआधीच ईडी चौकशीचा ससेमिरा आहे. त्यांना मुख्यमंत्री केल्यास भाजपाला आयता मुद्दा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिद्धरमय्या यांना झुकते माप देण्यात आले आहे. सिद्धरमय्या यांनी कर्नाटक मुख्यमंत्री म्हणून याआधी जबाबदारी पार पाडली असल्याने त्यांना सरकार चालविण्याचा अनुभव आहे. सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर अलीकडच्या काळात आपला कार्यकाळ पूर्ण करणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजना होत्या. मात्र या निर्णयाने डी.के. शिवकुमार यांचे समर्थक बिथरले आहेत. त्यांना आता उपमुख्यमंत्री पद आणि महत्वाची खाती देऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान १८ मे रोजी मुख्यमंत्रीसह प्रमुख नेत्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाच होणार याचे संकेतही शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. माझे सिद्धरमैया यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेक त्याग केले आहेत आणि सिद्धरमैया यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी सिद्धरमैया यांना पाठिंबा दिला आहे”, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे.