
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकणातील पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासून संशय घेतला जात आहे. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातानंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.या प्रकरणात अल्पवयीन आरोपीसह त्याचे वडील, आजोबा आणि आईलाही अटक झाली होती. जामीनावर सुटलेला बिल्डर विशाल अग्रवाल यांना तीन दिवसांपूर्वी पुन्हा अटक करण्यात आली मात्र त्यांच्या अटकेची माहिती पोलिसांनी सार्वजनिक केली नाही, यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा शंका घेतली जात आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे मद्यपान करुन आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत बड्या बिल्डरच्या मुलाने दोन आयटी इंजिनिअर्सला जोरादार धडक दिली. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला तातडीने जामीन देण्यात आल्याने आणि जामीन देताना त्याला 300 शब्दात निबंध लिहिण्याची शिक्षा दिल्याने हे प्रकरण देशभर चर्चेत आले. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवालला देखील अटक झाली होती. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले होते.
विशाल अग्रवाल यांच्यासंदर्भात कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी समोर यावे असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानुसार विशाल अग्रवालला सोसायटी धारकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात हिंजवडी पोलिसांनी मंगळवारी ( 2 जुलै) अटक केली होती. सोसायटी धारकांच्या फसवणूक प्रकरणी त्याची चौकशी सुरु होती. पोलिसांनी त्यासाठी तीन दिवसांची कोठडी मागितली होती. या कोठडीची मुदत आज (गुरुवार) संपत आहे. त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.
बिल्डर विशाल अग्रवाल याला पोलिसांनी मंगळवारी अटक केल्याच्या बातमी बाबत गुप्तता पाळण्यात आली. पुणे पोलिस हे कोणत्याही छोट्या मोठ्या घटनेतील आरोपीच्या अटकेची माहिती माध्यमांना देतात, मात्र पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या वडिलांना पुन्हा अटक करण्यात आल्याची बातमी सार्वजनिक का करण्यात आली नाही, याबद्दल पोलिसांच्या भूमिकेवर संशय उत्पन्न होत आहे.सोसायटीधारकांच्या फसवणुकीचे हे प्रकरण आहे. सोसायटी धारकांची नेमकी काय आणि कशी फसवणूक करण्यात आली, याबद्दल पोलिस गुप्तता का पाळत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.