
चोरीचा आरोप करत सुरक्षा रक्षकाला लटकवून मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, माफी मागूनही केली बेदम मारहाण, नेमका वाद काय?
गुरुग्राम – गुरुग्राममधील एका इमारतीत एका स्थलांतरित कामगाराला उलटे लटकवून क्रूरपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुग्रामच्या सेक्टर ३७ मधील आयएलडी ग्रीन्स कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. व्हिडिओ सुमारे दीड मिनिटांचा आहे. एका बहुमजली इमारतीच्या पार्किंग क्षेत्रात दहाहून अधिक लोक जमले आहेत. यापैकी दोघे जण एका व्यक्तीला दोरीने पाय बांधून लोखंडी पाईपवर उलटे लटकवत आहेत. यानंतर, पांढरा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेला एक व्यक्ती प्लास्टिकच्या पाईपवर उलटे लटकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करू लागतो. व्हिडिओमध्ये, पीडित हात जोडून माफी मागताना दिसत आहे, परंतु कोणीही त्याचे ऐकत नाही. तिथे उपस्थित असलेले लोक काही वस्तू गायब झाल्याबद्दल आपापसात बोलत आहेत आणि उलट्या लटकलेल्या व्यक्तीवर चोरीचा आरोप करत आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की ही घटना जून २०२५ ची आहे आणि गुरुग्रामच्या सेक्टर-३७ सी मधील द्वारका एक्सप्रेसवेजवळील एका सोसायटीमध्ये घडली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे प्रकरण दीड महिना दाबून ठेवण्यात आले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि आता गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणात ४ जणांना अटक केली आहे. तक्रारीनुसार, मारहाण झालेला व्यक्ती त्या ठिकाणी जेसीबी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि त्याचे अपहरण करून चुकीच्या पद्धतीने बंदिस्त आणि छळ करण्यात आला, असा आरोप आहे. पोलिसांनी स्वतःहून अज्ञात आरोपींविरोधात एफआयआर दाखल करून चार जणांना अटक केली आहे. तसेच पोलीस सध्या पीडिताचाही शोध घेत आहेत.
मारहाण करणारा व्यक्ती भाटीजी संबोधनावरुन ‘राप्ती टाइमलाइन इन्फ्रा’ (इंडिया) या फर्मचा योगेंद्र भाटी असल्याचे मानले जात आहे. तो एक इमारत कंत्राटदार आहे आणि तो स्वतःला हरियाणातील केंद्रीय मंत्र्याचा निकटवर्तीय असल्याचे सांगतो. तसेच, त्याची पत्नी उच्च न्यायालयात वकील असल्याचा दावा करत पीडिताला सातत्याने धमकावत होता. मात्र, या दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.