काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांनी आपल्या साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. रविवारी हेलिकॉप्टरने ते ठाण्यात दाखल झाले. गावी असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे ते ठाण्यात आल्यानंतर अनेक नेतेमंडळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. विजय शिवतारेदेखील एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. ज्यामुळे ते चांगलेच संतापले. विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी अडवली होती. तुम्ही कोण आहात, थांबा अशी विचारणा करत पोलिसांनी विजय शिवतारे यांना अडवलं. दरम्यान यामुळे विजय शिवतारे चिडले. पोलिसांनी ओळखलं नसल्याने विजय शिवतारेंनी पोलिसांना दम दिला. “तुम्हाला आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाहीत का? असं प्रत्येक वेळेस करतात. हे बरोबर नाही. तुम्ही किती वर्षं झाले काम करत आहात. अख्ख्या महाराष्ट्रभर गाडी फिरत असते. प्रत्येक वेळी तुम्ही असं करणं योग्य नाही”, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना झाडलं.