Latest Marathi News
Ganesh J GIF

स्वत:वरच ॲसिड ओतलं अन् संपूर्ण शहर हादरवलं!; पंढरपूरमधील त्या तरुणीचा खळबळजनक बनाव उघड

पंढरपूर शहरात काल एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयक्तिक कारणातून घडला आहे. या तरुणीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव तिने रचला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तसेच पीडित तरुणीचे जबाब नोंदवले. मात्र, तिने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अखेर त्या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली.

पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, या घटनेबाबत काल आम्हाला पिडीत तरूणी आणि तिच्या आईने आम्हाला तिच्यावरती अज्ञाताने ॲसिड हल्ला केला असल्याचं सांगितलं, घटनेनंतर तरूणीला रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होते, त्यानंतर आम्ही तपास केला, परिसरातील सीसीटिव्ही तपासले त्यानंतर जबाब नोंदवले, यावेळी आम्हाला तरूणीच्या जबाबात तफावत आढळली, त्यानंतर तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. चौकशीत ही सर्व माहिती समोर आली आहे, तिने आपल्या उजव्या बाजुला चेहऱ्यावर हे ॲसिड टाकला. ६० रूपयांना हे ॲसिड कोणत्याही दुकांनामध्ये मिळत आपण ते बाथरूम टॉयलेट धुण्यासाठी वापरतो. ते तिने एका दुकानातून विकत घेतलं, आणि जिथे सीसीटीव्ही नाही, रहदारी नाही, गल्लीबोळ आहे, त्या ठिकाणी तिने स्वतःच अंगावर ओतून घेतलं.

निर्भया पथकाच्या पीएसआय, पिडीतेची आई, रूग्णालयातील डॉक्टर, यांच्यासमोर तरूणीचे व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्यामध्ये पिडीता सांगते की, ती आजारी होती, तिला काही वर्षांपासून लिव्हरचा आजार आहे. अनेक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे तिच्यावरती उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिच्या घरातील लोकांनी तिला दिलेले टोमणे आणि इतर गोष्टींना तिने कंटाळून हे केलेलं असल्याचं तिने सर्वासमोर सांगितलं आहे. आईने देखील यावर सहमती दाखवली आहे, तिला मेटंली त्रास होत होता. तीची प्रकृती स्थिर आहे. ॲसिड तिच्या डोळ्यात गेलं होतं, पण तिच्या शरीरावरती काही जखमा नाहीत, डॉक्टरांचे रिपोर्ट घेणे बाकी आहे, काल आठ वाजता माहिती मिळाली, काहींना चौकशीसाठी बोलावलं होतं, बाकी तपास सुरू आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!