शिवसेनेच्या जुन्या वै-याची ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीची साद
एकेकाळचे वैरी आज मित्र, राज्याच्या राजकारणाला कलाटणी भेटणार?
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राजकारणात रोज धक्कादायक घटना घडत आहेत. आजही राज्याच्या राजकारणात अशीच घटना घडली आहे. शिवसेनेच्या एकेकाळचा कट्टर विरोधात असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची ताकत वाढली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक येत्या तीन नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी १४ आॅक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असताना ‘सीपीआय’ने यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईत शिवसेना आणि कम्युनिस्ट असावे जुना राजकीय संघर्ष आहे. सत्तरच्या दशकात या दोन संघटनांमधील वाद विकोपाला गेला होता. अगदी दोघांमध्ये रक्तरंजित संघर्ष अनुभवास आला आहे. कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हत्येत हात असल्याचा आरोप झाला. मात्र बाळासाहेब ठाकरेंवरचे आरोप कोर्टात टिकले नाहीत. कम्युनिस्टांचा मुंबईत असलेला प्रभाव कमी होऊन शिवसेनेचे वर्चस्व वाढत गेले. मात्र, शिवसेना आणि कम्युनिस्टांमधून विस्तवही जात नव्हता. पण आता राजकारणात मोठा बदल झाला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटून कम्युनिस्टांनी दिलेला पाठिंबा महत्वपूर्ण आहे.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली राव यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरेगांवकर उपस्थित होते. भाजपाला पराभूत करण्यासाठी सीपीआयने महाविकास आघाडीला निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे.