
धक्कादायक! पुण्यात पहिल्या मजल्यावर चालकासह कार कोसळली
कारसह चालक थेट पहिल्या मजल्यावरुन खाली, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, चूक कोणाची?
पुणे – पुणे तिथे काय उणे अशी म्हण असणाऱ्या पुण्यात रोज काही ना काही घटना घडत असतात. अपघात हे तर नित्याचे झाले आहे. असाच एक अपघात एका सोसायटीत घडला असून याच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे.
पुण्यातील विमान नगर परिसरात शुभ अपार्टमेंट या सोसायतीत हा अपघात घडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही एक कार पाहू शकता. ही कार दुसऱ्या मजल्यावरची भिंत फोडून खाली पडताना दिसतेय. ही कार खाली पडली तेव्हा सुदैवानं आसपास कोणाही नव्हतं त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच सुदैवाने कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला. इमारतीत पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये रविवारी चालक हा गाडी मागे घेत होता. यावेळी त्याला मागच्या भिंतीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही कार थेट खाली कोसळली. इमारतीच्या पार्किंगची भिंत कमकुवत असल्याने कारचा धक्का बसताच भिंत तुटून कार देखील खाली कोसळली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण कारचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच कारमधील ड्रायव्हर देखील किरकोळ जखमी झाला असल्याचं बोललं जात आहे. या थरारक घटनेमध्ये नेमकी चुकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. पण या प्रकरणामुळे लोकांमध्ये मात्र भितीचं वातावरण पसरलं आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. आणि आता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.