
धक्कादायक! रस्त्यावर पायी चालणाऱ्या मुलीची काढली छेड
छेड काढतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, महिला सुरक्षा वाऱ्यावर, गृहमंत्र्यांचे असंवेदनशील वक्तव्य
बंगरुळू- देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक महिलांना रोज छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागते. सध्या बंगरुळूमध्ये एका तरुणीची छेड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मुलीची छेड काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाैकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बेंगळुरूच्या एका निर्जन रस्त्यावरून दोन मुली जात होत्या. तेवढ्यात मागून एक मुलगा आला आणि त्याने एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना घडल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बंगळुरूतील बीटीएम लेआउटमधील सुद्दागुंटे पल्या येथील एका निर्जन रस्त्यावर हा प्रकार घडला. आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण होत आहे. वारंवार असे प्रकार घडल्याने नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे.
मोठ्या शहरांत अशा घटना घडतचाच अशी असंवेदनशील प्रतिक्रिया कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात येत आहे.