धक्कादायक! पुण्यात कोयत्याने वार करून तरुणीची हत्या
पुण्यात कोयता गँगचा हैदोस, या वादातून केली हत्या, पुण्यात महिला असुरक्षित
पुणे – विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता कोयता गँग आणि गुन्हेगारीचे शहर अशी झाली आहे. कारण पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. काल येरवडा येथील प्रसिद्ध आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. तिचा आज मृत्यू झाला आहे.
शुभदा कोदारे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा कनोजा असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कनोजा हा शुभदाच्या ओळखीचा आहे. पण काही दिवसांपुर्वी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. घटनेच्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी शुभदा ही काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती. यावेळी आरोपी कृष्णा तिथे आला. त्याचा हातात चाकू होता. दोघांमध्ये पैशावरुन वाद सुरू होता. या वादातून कृष्णाने शुभदावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर मोठी जखम झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्त स्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. पैशांच्या देवाण घेवाण यातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना झाल्याने, कंपनीच्या आवारात देखील मुली सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.