खून तसेच विविध गुन्ह्यांमुळे तडीपार करण्यात आलेल्या गुंडाने तडीपारीचा भंग करुन कात्रजमधील एका घरात शिरुन मुलीला धमकी दिली. ”तू माझी झाली नाहीस तर मी तुझ्या घरातील कोणालाच सोडणार नाही व स्वत:चा देखील जीव देईन, ” अशी धमकी तो देत होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला कोयत्यासह अटक केली.
दत्ता राहुल कदम (वय २३) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार नवनाथ भोसले यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मांगडेवाडी, जाधवनगर येथील सोसायटीत घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता राहुल कदम व त्याच्या साथीदारांनी प्रकाश रेणुसे याच्यावर १३ डिसेबर २०२२ रोजी लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना प्रकाश रेणुसे यांचा १९ डिसेंबर रोजी मृत्यु झाला. दत्ता कदम यांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी त्याला ऑगस्ट २०२३ मध्ये तडीपार केले होते.
फिर्यादी व त्यांचे सहकारी विटेकर हे गुरुवारी सायंकाळी कात्रज मार्शल म्हणून पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नियंत्रण कक्षातून त्यांना एका महिलेचा कॉल आला. कॉल करणारी महिला घरात नसून एक मुलगा त्यांच्या घरात शिरला आहे. त्यांच्या मुलीला चाकूचा धाक दाखवत आहे. फिर्यादी हे या महिलेसह सोसायटीत पोहचले.तेव्हा सोसायटीच्या पार्किंगमध्ये लोक जमा झाले होते. तडीपार गुंड दत्ता कदम हा हातातील कोयता हवेत फिरवून येणार्या जाणार्या नागरिकांना धमकावून शिवीगाळ करीत होता. स्वत:च्या हातावर कोयता मारुन घेत होता. फिर्यादी व विटेकर यांनी त्याला कोयत्यासह पकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत