
पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
सतीश वाघ यांना संपवण्यासाठी पत्नी मोहिनीकडून अघोरी प्रकार, अक्षयने मोहिनीसाठी तब्बल.....
पुणे – आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सतीश यांना संपवण्यासाठी जवळपास एका वर्षापासून त्यांची पत्नी मोहिनी आणि तिचा प्रियकर अक्षय जवळकर हे दोघे नियोजन करत होते.सतीश वाघ यांना संशय आल्याने ते दोघे घरात भेटता येत नसल्यामुळे एका लॉजवर भेटत असत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश यांचा खून करण्यापूर्वी मोहिनी हिने एका मांत्रिक महिलेची देखील वाघ यांना आपल्या वाटेतून बाजूला करण्यासाठी मदत घेतली असल्याची माहिती आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. अक्षयने खुनाची सुपारी पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना दिली. त्यांनी तीन वेळा रेकी केली. सुरुवातीला दुचाकीवरून येऊन ठार मारण्याचे नियोजन केले. परंतु, परिसरातील गर्दी पाहता हे त्यांना शक्य झाले नाही. त्यानंतर लक्ष ठेवून संधी मिळाल्यानंतर त्यांचं अपहरण केलं आणि त्यांच्यावर चारचाकी गाडीमध्ये वार करून त्यांचा जीव घेतला त्यांनंतर त्यांना शिंदवणे घाटातील निर्जन स्थळी फेकून दिलं.
सतीश वाघ यांची सुपारी पाच लाख रुपयांना देण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सुपारीतील एकही रुपया मोहिनीने दिला नसल्याची माहिती आहे. अक्षय जवळकरने आपल्याकडील दीड लाख रुपये सुरुवातीला अॅडव्हान्स म्हणून शर्माच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यानंतर शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी सतीश वाघ यांचा खून केल्यानंतर त्याच दिवशी बाकीचे पैसे अक्षयने शर्माच्या घरी जाऊन दिले होते.
अक्षय हा सतीश वाघ यांच्याकडे भाड्याने राहत होता. या दरम्यान अक्षय आणि मोहिनी एकमेकांच्या संपर्कात आले. पण सतीश यांना मोहिनी आणि अक्षय या दोघांबाबत संशय आला. तेव्हा अक्षय याने ते घर सोडले मात्र दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरूच होते. तसेच मोहिनी पती सतीश यांच्या त्रासाला वैतागली होती. त्यामुळे दोघांनी मिळून सतीश वाघ यांची डिसेंबरमध्ये हत्या केली.