
धक्कादायक! जुना राग मनात धरून शाळकरी मुलीवर ब्लेडने वार
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, मुलीच्या टोळीचा मुलीवर जीवघेणा हल्ला, मुलीला पडले ५० टाके, नेमका वाद काय होता?
दिल्ली – अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसोंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. यात आता मुलीसुद्धा मागे नसल्याचे चित्र आहे. अशीच एक घटना दिल्लीत समोर आली आहे. मुलींच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
दिल्लीच्या अमन विहार परिसरातील शाळेत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी, एका विद्यार्थिनीने तिच्या बहिणीसह आणि इतर दोन विद्यार्थीनीसह मिळून बारावीच्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर ब्लेडने हल्ला केला. यामुळे पीडितेच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर ५० हून अधिक टाके घालावे लागले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शिक्षक दिन साजरा करण्याच्या मुद्द्यावरुन 9 सप्टेंबर रोजी पीडिता आणि त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यीनीमध्ये वाद झाला. या भांडणानंतर, हल्लेखोर विद्यार्थ्यीनीने काही मैत्रिणींसह हल्ला करण्याची योजना आखली. शाळेतील आणि बाहेरील सुमारे अर्धा डझन अल्पवयीन मुलींचा या हल्ल्यामध्ये समावेश होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की पीडिता तिच्या मैत्रिणींसह शाळेतून घरी जात असताना दुसऱ्या शाळेतील काही मुलींनी पीडितेला अडवले. सुरुवातीला काही वाद झाला. त्यांनंतर बाचबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. हल्लेखोर विद्यार्थिनींने पीडितेवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात पीडितेच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर खोल जखमा झाल्या आहेत. पीडितेने सांगितले की, या मुलींनी यापूर्वीही तिचा छळ केला होता, पण तिने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे मुलांमधील वाढती हिंसा चर्चेत आली आहे.
पीडितीच्या कुटुंबांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, निष्काळजीपणा दाखवला आणि धमकावण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप केला आहे.