
धक्कादायक! टीव्ही बंद करायला लावल्याने मुलाने केला वडिलांचा खून
धक्कादायक हत्याकांडामुळे पुणे हादरले, हे शब्द ऐकताच मुलगा संतापला, चाकू घेतला आणि....
पुणे – वडिलांनी टीव्ही बंद करुन डोळ्यात ड्रॉप टाकायला सांगितल्यामुळे संतापलेल्या मुलाने वडिलांच्या तोंडावर, गळ्यावर चाकूने वार करुन त्यांचा खुन केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. विशेष म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हा धक्कादायक घटना समोर आल्यामुळे ही घटना घडली आहे.
तानाजी पायगुडे असे खुन झालेल्यांचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन तानाजी पायगुडे या मुलाला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायगुडे कुटुंब जय भवानी नगर येथील चाळ क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास आहे. तानाजी पायगुडे हे घरीच असतात. तर त्यांचा मुलगा सचिन पायगुडे हा मिळेल तेथे मोलमजुरी करतो. तानाजी पायगुडे यांचे डोळे दुखत असल्याने ते डॉक्टरांकडे जाऊन आले होते. डॉक्टरांनी त्यांना डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप दिले होते. ते दुपारी घरातील वरच्या माळ्यावर असताना तानाजी पायगुडे यांनी मुलगा सचिन याला ‘टिव्ही बंद कर, डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे’, असे म्हणाले. या किरकोळ कारणावरून बाप आणि मुलगा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादामुळे सचिन इतका संतापला की, त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील चाकू घेऊन थेट आपल्या जन्मदात्या पित्यावर हल्ला चढवला. सचिनने आपल्या बापाच्या तोंडावर आणि गळ्यावर चाकूचे सपासप वार केले. या हल्ल्यात तानाजी पायगुडे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि सचिनला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या खुनामुळे परिसरात मोठी दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदिप पवार या घटनेचा तपास करत आहेत.