
धक्कादायक ! पुण्यात ६ वर्षांच्या दोन चिमुरडीवर धावत्या स्कूल बसमध्ये चालकाकडून लैंगिक अत्याचार, स्कुल बसचालकाला अटक
शाळेत ने आण करण्यासाठी लावलेल्या स्कुल बसचालकानेच ६ वर्षांच्या दोन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी स्कुल बसचालकाला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सहा वर्षाची मुलगी आपल्या खासगी जागेत खाज येत असल्याचे सांगत होती. तेथे आईला डाग व इन्फेक्शन झाल्याचे दिसून आले. तेव्हा तिने आपल्या मुलीला प्रेमाने विचारल्यावर तिने स्कुल बसचालक संजय अंकल बसमधून घरी येत असताना मला जवळ बसवून माझ्या शीच्या व सुच्या जागी हात लावून दाबतात व त्यावरुन हा फिरवतात. तीन चार दिवस झाले मला व माझ्या मैत्रिणीलाही असेच करतात, असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी दुसर्या दिवशी आपल्या मुलीला स्कुल बसमधून पाठविले नाही. मुलीच्या वडिलांनी तिला शाळेत सोडले. तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. तिच्या आईने देखील खात्री केली तेव्हा तिच्याबाबतीतही असाच प्रकार झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. वानवडी पोलिसांनी या नराधम स्कुल बसचालकाला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक देवधर तपास करीत आहेत.