
धक्कादायक! पोलीस पतीची हत्या करत पत्नीनेही केली आत्महत्या
लहान मुलासमोरच पतीची हत्या, दहा पानी सुसाईड नोट लिहित पत्नीनेही संपवले जीवन, धक्कादायक माहिती समोर
अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरगुती वादातून पत्नीनं मुलासमोर आपल्या पोलीस पतीची हत्या करुन स्वतः आत्महत्त्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे लहान मुलासमोर हा सर्व प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
मुकेश परमार असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तर, संगीत असे पत्नीचे नाव आहे. मुकेश परमार हे अहमदाबाद शहरातील दानीलीमडा पोलीस लाइनमध्ये कॉन्स्टेबल पदावर होते. ते ए डिव्हीजन ट्रॅफिक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. घरगुती वादातून ही घटना घडली आहे. पण सुसाईड नोट सापडल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. मृत मुकेश परमारचे दुसऱ्या महिला सहकाऱ्याशी प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळाली आहे. यामुळेच त्यांच्यात वाद होत होते. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला. यावेळी संगीताने मुकेशच्या डोक्यात मुलाच्या खेळण्यातील घोड्याच्या लाकडी पायाने वार केला. त्यामुळे मुकेश खाली कोसळला. रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संगीतानेही गळफास घेत आत्महत्या केली. हा सर्व प्रकार घडत असताना त्यांच्या लहान मुलगा घरातच उपस्थित होता.
सुसाईड नोटच्या आधारे पोलीस संबंधित महिलेची चाैकशी करणार आहेत, ती महिला देखील वाहतूक विभागात कामाला आहे. पोलिसांनी खून आणि अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.