
सतत अश्लील मेसेज करणाऱ्या दुकान मालकाला तरुणीचा चोप
पाय धरून माफीही मागायला लावली, धडा शिकवतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन गुन्हे दाखल, नेमके काय घडले?
ठाणे – कामाच्या ठिकाणी महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, त्याविरोधात अनेक नियम कायदे अमलात आणूनही अश्या घटना कमी होत नाहीत, आता ठाण्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे, यात तरुणीने मालकाला चांगलाच धडा शिकवला आहे.
कल्याण पूर्वेतील जुने कोळसेवाडी पोलीस ठाणे भागात सौभाग्य नाॅव्हेल्टी कपड्याचे दुकान आहे. या दुकानात एक अल्पवयीन तरुणी काम करत होती. भवन अवचल पटेलअसे दुकानदाराचे नाव आहे. दुकानमालक तिला सतत अश्लील मेसेज पाठवायचा, पण कामाची गरज असल्यामुळे ती सुरुवातीला शांत होती, पण मेसेजचे प्रमाण वाढल्यामुळे तरुणीने हा प्रकार घरी सांगितला. परिसरातील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना देख ही माहिती देण्यात आली. त्यानंतर तरुणी आपल्या कुटुंबियांसह त्या दुकानात गेली, आणि आपल्या पायातील चप्पल काढून तिथेच दुकानदाराला चोप दिला. एवढेच नाही तर दुकानदाराला तरुणीच्या पाया पडून सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तरुणी दुकानदाराला मारत असताना दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली होती. व्हिडिओत तरुणी दुकानदाराला चप्पलने वारंवार मारताना आणि रडताना दिसत आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतले. त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक धोंगडे करत आहेत.
तरूणीच्या तक्रारीवरून पटेलवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.