
शहरातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तर दोघांचा जीव घेणाऱ्या त्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला आज बाल न्यायालयाने काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.या घटनेनंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांना विनंती केली आहे. शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा. यामुळे पुण्याची संस्कृती तर टिकून राहिलच. शिवाय गैरप्रकार, अपघात आटोक्यात येतील असे त्यांनी सांगितले आहे.
धंगेकर म्हणाले, एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवत मध्यरात्री दुचाकीवरील दोघांना उडवले. कल्याणीनगर येथे घडलेल्या या घटनेमध्ये दुचाकीवरील निष्पाप अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे. कल्याणीनगर येथे घडलेली घटना रात्री उशिरापर्यंत पब आणि बार सुरू ठेवल्यामुळेच घडली आहे, असे अनेकांचे मत आहे.
न्यायालयात हजर केल्यानंतर मुलाला न्यायालयाने १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. याशिवाय ‘अपघात’ या विषयावर निबंध लिहिण्याची अट घातली असून तो आता येरवडा वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन करणार आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलिसांनी त्याला आज सुट्टीच्या बाल न्यायालयात हजर केले, तसेच त्याची पोलिस कोठडीही मागितली, परंतु न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला काही अटी व शर्तीवर जामीन दिल्याचे मुलाचे वकील ॲड.प्रशांत पाटील यांनी सांगितले.
शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात इंजिनिअर असलेल्या अनिस आणि अश्विनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी हृदयद्रावक होती की, घटनास्थळी दाखल झालेल्या परिसरातील रहिवाशांना रात्रभर झोप लागली नाही. रविवारी कल्याणीनगर रहिवाशांकडून या दोघांना घटनास्थळी मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काही नागरिकांना त्यांचे अश्रू आवरणे कठीण झाले होते. आमच्या डोळ्यासमोरून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अश्विनीचा चेहरा जाण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.