
मी अमित शहा यांच्याशी बोलू का? शिंदेंचा राऊत यांना फोन
ईडीच्या अटकेपुर्वी संजय राऊतांना आलेला एकनाथ शिंदेंचा फोन, राऊत म्हणाले, बोललात तरी मी तुमच्या पक्षात...
मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील गंभीर खुलासे केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.
पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज होणार असला तरीही त्यावर आत्तापासून चर्चा होऊ लागली आहे. महायुतीकडून या पुस्तकावर जोरदार टिका करण्यात येत आहे. पण आता संजय राऊत यांनी यावर उत्तर दिले आहे. संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. मी वरती बोलू का?, गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का?, असं एकनाथ शिंदे मला फोन करुन म्हणाले होते. यावर काहीच गरज नाही. तुम्ही माझ्याबद्दल वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही, असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले, असा गौप्यस्फोट राऊतांनी केला आहे. त्याचबरोबर संजय राऊत म्हणाले की, मला अटक करण्यापूर्वी माझ्या निकटवर्तीय लोकांना त्रास देण्यात आला. ईडीच्या अटकेआधी मी गृहमंत्री अमित शहांना फोन करत सांगितले होते कुटुंबियांना त्रास देण्यापेक्षा मी दिल्लीतील माझ्या बंगल्यावर आहे तिथून मला अटक करायची असेल तर करा. पण लोकांना त्रास देण्याची नौटंकी थांबवा. मी अमित शहांचा फोन ठेवला आणि आशिष शेलार यांचा मला फोन आला. मी शेलारांना सांगितले मला त्रास द्या मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे. पण ज्या लोकांचा याशी काही संबंध नाही त्यांना त्रास देऊ नका. त्यावेळी ईडीचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही सर्व माहिती देत होते, असाही दावा राऊत यांनी केला आहे. शिवसेना-भाजप युतीत दरी निर्माण होण्यास भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा ठपका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठेवला आहे. “अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला. स्व. अरुण जेटली यांनीही शहा यांना दोनदा समजावले होते की, शिवसेनेशी वागणुकीत सावधगिरी बाळगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे किंवा अन्य विरोधी पक्षांची संबंध कधीही वाईट नव्हते. अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर हे सर्व सुरू झाले, असे राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाल साहित्याचा अपमान होत आहे. राज्य बाल साहित्याला पुरस्कार देते हे यांना माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एवढीच काय ती त्यांची लेव्हल आहे. त्यांनी जशी युद्धबंदी स्वीकारली तसे त्यांनी पुस्तकातील सत्य स्वीकारायला हवे.