
धार्मिक कार्याचा आणि अध्यात्माचा खोटा बुरखा पांघरून शेकडो भाविकांना गंडा घालणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशोक खरातविरोधात 14वा गुन्हा दाखल झाला आहे.

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर महादेव मंदिराची साडेसोळा एकर जमीन फसवणुकीने बळकावल्याचे उघड झाले आहे. जमीन बळावल्या प्रकरणी खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत अशोक खरातविरोधात एकूण 14 गुन्हे दाखल झाले आहेत. मिरगावमधील माळी कुटुंबाला जाळ्यात ओढून खरातने हा काळा कारनामा केला. माळी कुटुंबातील सदस्यांना मरणाची भीती घालून खरातने साडेसोळा एकर जमीन कवडीमोल भावात स्वतःच्या नावावर करून घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीवर खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिर आणि एक आलिशान फार्म हाऊस उभारले आहे, ती जमीन या कुटुंबाकडून फसवणुकीने मिळवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सिन्नर पोलीस सध्या या जमिनीच्या व्यवहारांची सखोल चौकशी करत आहेत. विशेष तपास पथकाच्या चौकशीत खरातबद्दल आणखी एक हास्यास्पद आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या अशोक खरातला केवळ चारच मंत्र येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यात गायत्री मंत्रासह इतर तीन सामान्य मंत्रांचा समावेश आहे. केवळ एवढ्याशा माहितीवर त्याने हजारो लोकांना आपल्या भुलथापांनी भुरळ घातली होती. दरम्यान आज (9 एप्रिल) खरातला तिसऱ्या गुन्ह्यात नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

