Latest Marathi News
Ganesh J GIF

कोल्हापुरात बिबट्याच्या कातड्यांची तस्करी; रत्नागिरी कस्टम विभागाची मोठी कारवाई

कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

या कारवाईत दोन मौल्यवान कातडी आणि एक आलिशान कार जप्त केली आहे. याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दाेघे कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि दाेघे सातारा व लातूरमधील रहिवासी आहेत.

समीर तातू तेजम व राकेश रमेश बांदेकर (दाेघेही रा. कुडाळ), शेख नसरुद्दीन हबीब (रा. लातूर), विजय विष्णू जमदाडे (रा. सातारा), अशी अटक केलेल्या चाैघांची नावे आहेत. काही व्यक्ती बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती सीमा शुल्क विभागाच्या ‘प्रतिबंधक व गुप्तचर’ शाखेला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत अधीक्षक हिमांशू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने २९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर महामार्गावर सापळा रचला.

दोन वाहनांमधील एक मरून रंगाची ‘किया सेल्टोस’ आणि एक पांढऱ्या रंगाची ‘फोर्ड फिगो’ व्यक्तींकडे बिबट्याची दोन कातडी होती. त्या व्यक्ती पुणे-बंगळुरू महामार्गावरील शिरोली एमआयडीसीजवळ संभाव्य खरेदीदारांची वाट पाहत होत्या.

वाहनांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, पांढऱ्या रंगाची ‘फोर्ड फिगो’ गाडी अधिकाऱ्यांचे प्रयत्न धुडकावून लावत वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाली; मात्र त्या गाडीतील एक व्यक्ती बिबट्याची कातडी असलेली एक पिशवी घेऊन तिथेच मागे राहिली. त्याचबराेबर दुसऱ्या गाडीची झडती घेतली असता त्या वाहनातील तीन व्यक्तींना बिबट्याच्या कातड्यासह ताब्यात घेण्यात आले.

सीमा शुल्क विभागाने ही कातडी आणि तस्करीसाठी वापरलेली गाडी जप्त केली असून, घटनास्थळावरून काही आक्षेपार्ह कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक उपकरणेही ताब्यात घेतली आहेत.या कारवाईत अटक केलेल्या चाैघांना कोल्हापूरच्या वडगाव न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. चाैघांना ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!