
…म्हणून शिंदे गटाच्या आमदाराच्या अंगरक्षकाने वेटरवर रोखली बंदूक
हाॅटेलमधील त्या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल, या कारणामुळे वाद,गुन्हा दाखल
नाशिक – नाशिक रेल्वे स्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना पोळी दिली नाही, म्हणून शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने वेटरवर चक्क बंदूक रोखल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्या अंगरक्षकाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
विशाल झगडे असे या अंगरक्षकाचे नाव आहे. विशाल झगडे हा नाशिक ग्रामीण पोलिस दलामध्ये अमलदार म्हणून कार्यरत आहे. सागर निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास झगडे नाशिक रोड येथील हॉटेल रामकृष्णमध्ये मित्रांसोबत जेवणासाठी आला होता. यावेळी त्याने हाॅटेलमधील वेटर सिरॉन शेख याला रोटी आणण्यासाठी सांगितले. पण वेटरने रोटी नसल्याचे सांगितले. त्यावर विशाल झगडे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी वाद घालत त्याला दमबाजी केली. पोलीस अमलदार विशाल झगडे याने त्याच्या कमरेला असलेली पिस्तूल काढून शेख यांच्यावर रोखत, “मला रोटी पाहिजे तू तिकडे काहीही कर,” असे म्हणत शिवीगाळ केली. या प्रकरणी विशाल झगडे याचा विरोधात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल झगडे याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या व्हिडिओच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहे. दरम्यान विशाल झगडे याच्या संदर्भातील अहवाल ग्रामीण पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार विशाल झगडे याच्या विरोधात निलंबासह कठोर कारवाई केली जाणार आहे,” असं पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले आहे.
विशाल झगडे याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल झगडे यास अटक करून नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.