अकोला दि २१(प्रतिनिधी)- अकोल्यातील एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निकिता गणेश गावंडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे.
निकिताचा विवाह २०२२ च्या एप्रिल महिन्यात अकोला जिल्ह्यात झाला होता. येथील गणेश गावंडे याच्याशी निकिताचा विवाह झाला होता. अनेक स्वप्न उराशी बाळगून निकिताने नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. पण लग्नानंतर निकिताच्या सासरकडील मंडळींनी तिला प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरुन ६ लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला होता. त्याचबरोबर ते निकिताला शारीरिक आणि मानसिक त्रास देखील देत होते. निकिताचा पती गणेश हा तिला पैशांच्या मागणीसाठी मारहाण करीत होता. सात महिन्यातच निकिताच्या संसाराची राख रांगोळी झाल्याने दोन दिवसांपूर्वी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेगाव तालुक्यातील डोलारखेडची लेक सासरच्या मंडळींना असलेल्या पैशाच्या हव्यासाचा बळी ठरली आहे.
निकिताचा भाऊ शुभमने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून निकिताच्या पती, सासू सासरे यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत. पण, त्यानंतर देखील महिलांचा छळ कमी झालेला नाही. हेच या घटनेवरुन दिसून आले आहे.