पुणे दि १६ (प्रतिनिधी) -लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या १५ प्रदीर्घ निष्क्रिय कारकीर्दीत स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्न सोडाच पण साधा विचारही केला नाही, त्यांनी माझ्या शिव-शंभु भक्तीविषयी, माझ्या हिंदुत्वाविषयी बोलणं योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या वयाचा मान त्यांनी स्वतःच राखावा अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांचा उल्लेख टाळून सुनावले आहे.
कोल्हे म्हणाले खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी ही माझी मालिका सन २०२० मध्येच संपली असताना त्यानंतर २ वर्षांनी या मालिकेच्या प्रमोशनसाठी मी स्मारकाचे नाव बदलणं अशी टीका म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे असे मला वाटते. धर्मवीर या उपाधीपेक्षा ‘स्वराज्य रक्षक’ हे विशेषण अधिक व्यापक स्वरुपाचे असून ज्या छत्रपती संभाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला एकही किल्ला जिंकू दिला नाही. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी ८ वर्ष लढा देत स्वराज्याचे रक्षण केले. त्याअर्थाने विचार केला तर ‘स्वराज्य रक्षक’ हे विशेषण सर्वार्थाने उचित असेच आहे. पण ज्यांना १५ वर्षांत छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी काडीचेही काम करता आले नाही. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात केंद्रात व राज्यात दोन्हीकडे युतीची सत्ता असतानाही एकही महत्वाचा प्रकल्प त्यांना मार्गी लावता आला नाही. निष्क्रिय कारकीर्दीत मतदारसंघाचा विकास करता आला नाही म्हणूनच मायबाप मतदारांनी त्यांना घरी बसवले. आता निदान स्वतःच्या वयाचा तरी मान राखावा ही माफक अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली.
सध्याच्या परिस्थितीत नेमकं आपण कुणाच्या बाजूने बोलायचं आहे हेच त्यांना ठाऊक नाही. माजी लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता सूज्ञ आहे. कोण प्रामाणिकपणे विकासाचे कार्य करतंय हे त्यांना पुरेपूर माहिती आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.