
…म्हणून तरूणाने मुजोर कॅब चालकाला भररस्त्यात दिला चोप
प्रवासाचा वाद पोहोचला भाषा वादावर, व्हिडीओ व्हायरल, कॅब चालकाची मुजोरी की तरुणाची दादागिरी?
मुंबई – मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहेत. आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका वाद घालणाऱ्या टॅक्सी चालकाला बेदम चोप देण्यात आला आहे.
एका तरुणाने ऑनलाइन कॅब बुक केली, एका कॅब चालकानेही त्याची राईड रिक्वेस्ट स्वीकारली. पण, चालक कॅब घेऊन पाच मिनिटे उशिरा पोहोचला. पण, उशिरा पोहोचल्यानंतर अचानक त्याने मला जायचे नाही असं सांगण्यास सुरुवात केली. यावर तरुणाने जर तुला जायचं नव्हतं मग राईड रिक्वेस्ट का स्वीकारलीस? ज्यावर कॅब चालकाने उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली, त्यामुळे तरुण संतापला आणि वादाला सुरुवात झाली. पण प्रवासावरुन सुरु झालेला हा वाद अचानक हिंदी मराठी वादावर आला. संतापलेल्या तरुणाने व्हिडीओ ऑन करत मुजोर कॅब चालकाला खडसावण्यास सुरुवात केली. पण कॅबचालक उडवाउडवीची उत्तरे देत होता. तरूणाने चालकाला आरटीओत तक्रार करणार असे सांगितल्यावरही तु तक्रार कर मला फरक पडत नाही, असे म्हणत वाद आणखी वाढवला. यावेळी त्या तरुणासह काही लोकांनी मिळून चालकाला भररस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर स्वत:चा बचाव करण्यासाठी कॅबचालक कॅब सोडून पळून गेला. हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक आता कमेंट्स करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. काहींनी कॅब चालक तर काहींनी तरुणाची बाजू योग्य असल्याचे सांगितले आहे. तसेच भाषा वाद दुर्देवी असल्याचेही मत मांडत नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांची भुमिका अस्पष्ट आहे. मध्यंतरी भांडुपमध्ये एका पिझ्झा डिलिव्हरी बाॅयलाही हिंदी असल्यामुळे पैसे देण्यास नकार दिल्याची घटना समोर आली होती.