
सासरच्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने जावयाची आत्महत्या
लग्नावेळी सासरच्यांनी लपवली होती 'ही' गोष्ट, आठ महिन्यातच पतीने संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर – सासुरवाडीतील नातेवाईकांनी आमच्या मुलीला का नांदवत नाही म्हणून जावयासह परिवारातील सदस्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे जावयाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कार्तिक नारायण लंबे असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील भोकरगाव शिवारात उघडकीस आली. कार्तिक यांचे भाऊ गणेश लांबे यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी कार्तिक यांची पत्नी रुचा, वडील साईनाथ सोनवणे, आई, भाऊ पवनस सोनवणे, मामा बंडू पवार, विजय पवार, आणि बाबासाहेब त्रिंबक सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तीक गणेश लंबे याचा विवाह वैजापूर तालुक्यातील भादली येथील रुची साईनाथ सोनवणे हिच्या सोबत ३ एप्रिल २०२४ मध्ये झाला होता. मात्र विवाहिता मतीमंद असल्याचे सांगून लग्न करण्यात आला होता. त्यामुळे तिला माहेरी पाठवण्यात आले. त्यानंतर कार्तिकचे सासू, सासरे, पत्नी व मामेसासरे हे कार्तिकला यामुळे नेहमी धमकी देत होते. अशातच काही दिवसांपूर्वी वरील आरोपींनी शेत वस्तीवर येऊन कार्तिकसह कुटुंबीयांना शिवीगाळ केली. त्यानंतर पुन्हा एकदा बाबासाहेब त्रिंबक सोनवणे यांनी फोन करून धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या कार्तिकने रविवारी सकाळी गळफास घेऊन शेतबांधावर आत्महत्या केली.
या प्रकरणात माहेरकडील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी मयतांच्या नातेवाईकांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.