
देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंमध्ये वादाची ठिणगी? राजकीय उलथापालथ होणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छाटले एकनाथ शिंदेचे पंख, हायकमांडकडे केलेल्या तक्रारींमध्ये शिंदे फडणवीसांमध्ये तणाव, महायुती फुटणार?
मुंबई – स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच, सत्ताधारी पक्षांमध्ये नाराजी नाट्यदेखील सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी नाराजीचा सूर आळवला आहे.
मोठ्या महापालिकांप्रमाणे आता ड वर्ग महापालिकांमध्येही भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण याच निर्णयामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण एकप्रकारे हा निर्णय शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर अतिक्रमण केल्यासारखा आहे. म्हणूनच हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान्य नसून महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्ती न करता राज्य शहरी प्रशासन सेवा किवा राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्याची प्रचलित पद्धत कायम ठेवावा अशी मागणी शिंदेंच्या नगरविकास खात्याने केली आहे. मागील काही दिवसात ड दर्जा असलेली महापालिकांमध्ये आयुक्तांचे गैरप्रकार समोर आले होते, त्याला आळा घालण्यासाठी थेट भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आतापर्यंत ‘ड’ वर्गाच्या महापालिकांवर बिगर सनदी अधिकारी नियुक्त केले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महापालिकांवरही आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे साडेचार लाखाहून अधिक लोकसंख्या आणि ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसंकल्प असलेल्या १९ महापालिकांमध्ये आता सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याआधी ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. काही दिवसांपूर्वी बेस्टमधील अधिकारी निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आत त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्यानेही त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे. नगर विकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप होत असल्याने शिंदे कमालीचे नाराज झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे शिंदेचे पंख छाटत असल्याची चर्चा आहे. कारण शिंदे यांचा सततचा रुसवा आणि हायकमांडकडे केली जाणारी तक्रार यामुळे फडणवीस शिंदे यांचे अधिकार कमी करत एकप्रकारे इशारा देत आहेत, त्यामुळे राज्यात लवकरच नवीन राजकिय उलथापालथ होण्याची शक्यता वाढली आहे.