लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजप व शिंदे गटात वादाची ठिणगी?
लोकसभेसाठी शिंदे गटाची एवढ्या जागांची मागणी, भाजपाचा नकार, जागा वाटपाने युतीत बेबनाव?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वादविवाद सुरु असतानाच महायुतीतही वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाने भाजपकडे २२ जागांची मागणी केली असून भाजपाकडुन मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरुन पहिली ठिणगी पडली आहे.
केसरकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, जागावाटपाबाबत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे आधीचे सूत्र होतं ते कायम राहिल अशी आमची अपेक्षा आहे. या सूत्रानुसार थोड्या जागा आधिकच्या हे भाजप आधीपासूनच घेत आला आहे. शिवसेना राज्यात जास्त लक्ष केंद्रीत करत आली आहे. आमच्या वाट्याला ज्या जागा येतात त्या जागांसदर्भात तयारी करणं हे आमचं कर्तव्य आहे. असे केसरकर म्हणाले आहेत.त्यामुळे शिवसेनेने भाजपाकडे अप्रत्यक्षपणे लोकसभेच्या २२ जागांची मागणी केली आहे. पण सध्याची बदललेली राजकीय समीकरणे पाहता भाजपा ही २२ जागांची मागणी पूर्ण करण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. अर्थात जागावाटपाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा मु्द्दा आहे. लोकसभेची तयारी प्रत्येकाने सुरू केली पाहिजे. किती जागा मिळतात हे फार महत्वाचे नाही. जागा जिंकणे जास्त महत्वाचे असते, अशी पुस्तीही केसरकर यांनी जोडली आहे. त्यामुळे जास्त जागांची मागणी करत शिंदे गट भाजपावर दबाव टाकत असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान मध्यंतरी भाजपाने शिंदे गटाला विधानसभेला ५० जागा देणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे या २२ जागांची मान्य होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्य सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही त्यांनी भाष्य केले. अधिवेशन सुरू होण्याआधी मंत्र्यांना त्यांच्या विभागांची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे नक्की पण तारीख सांगू शकत नाही असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.