
बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा,महिलांचे व मुलींचे गुप्तपणे अश्लील चित्रीकरण
मोबाईलमध्ये17 अश्लील व्हिडिओ आढळले
रायगड – तळोजा परिसरातील धानसर गावातील रियांश फार्महाऊसमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्महाऊसच्या बाथरुममध्ये हिडन स्पाय कॅमेरा बसवून महिलांचे व मुलींचे गुप्तपणे अश्लील चित्रीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फार्महाऊसचा व्यवस्थापक मनोज भगवान चौधरी (वय 35, रा. रांजणपाडा, खारघर) याला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका कुटुंबाने पिकनिकसाठी फार्महाऊसवर मुक्काम केला होता. रात्रीच्या सुमारास एका महिलेला बाथरुममधील आरशामागे सूक्ष्म लाईट चमकताना दिसली. संशय आल्यावर तपास केल्यावर तिथे लपवलेला हिडन कॅमेरा आढळला. तिने ही बाब नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी व्यवस्थापकाकडे चौकशी केली असता, तो स्वतःच बाथरुममध्ये चित्रीत केलेले व्हिडिओ पाहत असल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तपासात आरशाच्या मागे लपवलेला स्पाय कॅमेरा सापडला. पोलिसांनी चौधरीला अटक करून त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला. तपासादरम्यान मोबाईलमध्ये सुमारे 17 अश्लील व्हिडिओ आढळले असून त्यात काही महिलांचे तसेच अल्पवयीन मुलींचे अंघोळ करतानाचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. काही व्हिडिओ आरोपीने डिलीट केल्याचेही कबूल केले असून सायबर तज्ञांच्या मदतीने ते डेटा पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घृणास्पद कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पनवेल न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास तळोजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निकम करत आहेत.



 
						 
			