अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक ; हल्ल्यात देशमुख गंभीर जखमी, हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर सोमवार (दि.१८) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख यांच्या कपाळाला गंभीर इजा झाली.
काटोल-नरखेड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून देशमुख परत येत असताना चार युवक अचानक गाडीसमोर आले. एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. रक्तस्राव झाल्याने त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेवर आता शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.’अनिल देशमुख आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. या संघर्षामुळे देशमुख यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असं आमच्या ऐकिवात होतं. जे ऐकिवात होतं ते प्रत्यक्षात घडलं आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे आज स्पष्ट झालं आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो’, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
शरद पवार म्हणाले, ‘ मी काही दिवसांपूर्वीच काटोल इथं गेलो होतो. त्याठिकाणी अनिल देशमुख आणि त्यांच्या चिरंजीवांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय ते पाहून सत्ताधारी पक्षाचे लोक अस्वस्थ झाल्याचं माझ्या ऐकिवात होतं. हा प्रतिसाद सहन न झाल्याने आता अनिल देशमुख यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी मी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार, हा निवडणुकीतूनच झालेला हल्ला आहे,’ असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. पवार म्हणाले, अनिल देशमुख हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. अशा सुसंस्कृत व्यक्तींवर हल्ला होणे निषेधार्थ आहे. याप्रकरणी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अन्यथा संघर्षाची भूमिका घेणार अशी संतप्त प्रतिक्रिया पवारांनी दिली.