अजबच! महिला शिक्षिकेने वर्गातच केले विद्यार्थ्यांशी लग्न
लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, विवाह प्रमाणपत्रही व्हायरल शिक्षिका म्हणाली, हे लग्न...
कोलकत्ता – पश्चिम बंगालमधील विद्यापीठात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वरिष्ठ महिला प्राध्यापिकेने भरवर्गात चक्क पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याशी लग्नगाठ बांधली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता विद्यापीठाने चौकशीचे आदेश दिले आहेत. पण या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. तसेच प्राध्यापिकेवर टिका होत आहे.
पश्चिम बंगालच्या मैलाना अबुल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी काॅलेजमधील अप्लाइड सायकॉलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला प्राध्यापिका बॅनर्जी पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी विधिवत लग्न करत आहे. तर यावेळी प्राध्यापिका पारंपरिक बंगाली वधूप्रमाणे नटली होती. विद्यार्थ्याने शिक्षिकेला सिंदूर लावत गळ्यात फुलांची माळ घालत लग्न केले. विशेष म्हणजे मानसशास्त्राच्या वर्गातच हा लग्न समारंभ पार पडला. व्हिडीओच्या व्यतिरिक्त एक हस्तलिखित ‘विवाह नोंदणी प्रमाणपत्र’देखील व्हायरल झालं आहे. यामध्ये तीन साक्षीदारांसह विद्यार्थी आणि शिक्षिकेचेही सही आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन करून याची चौकशी सुरू केली आहे. तसेच प्राध्यापिकेकडून योग्य तो खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शिक्षिकेला सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले आहे.
वाद निर्माण झाल्यानंतर बॅनर्जी यांनी आपली बाजू मांडली आहे. हे लग्न नव्हतं, तर फ्रेशर्स पार्टीसाठी बसवण्यात आलेले एक नाटक होते, असा दावा केला आहे. तसेच काही विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.