(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर एका आत्महत्येचा थरार अटल सेतूवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कॅब चालक आणि अटल सेतूवरील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचविण्यात आले आहे. या घटनेबाबत आता सगळीकडे चर्चा सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महचत्त्वाची पोस्ट करत नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
गृहमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर लिहले, अटल सेतूवरील आत्महत्येचा प्रयत्न थांबवण्यासाठी नवी मुंबई पोलीस टीम आणि कॅब चालकाने दाखवलेले धाडस आणि तत्परतेला सलाम! प्रत्येक, नागरिकाला आवाहन आहे की आत्महत्येसारखे टोकाचे आणि चुकीचे पाऊल उचलू नका. हा पण एक गुन्हा आहे आणि असे करून कोणत्याही समस्येचे समाधान मिळत नाही. एक आत्महत्या बरेच काही मागे सोडून जाते, असे त्यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी (ता. १६ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ५६ वर्षीय रीमा पटेल नामक महिला कॅबने अटल सेतूवर आली. यानंतर महिलेने सेतूवर एका ठिकाणी चालकाला कॅब थांबविण्यास सांगितली. यानंतर वाहनातून उतरून ती सेतूवरील सुरक्षा भिंत म्हणून उभारलेली रेलिंग क्रॉस करून सेतूच्या कडेला जाऊन उभी राहिली. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ही महिला सेतूवरील रेलिंगच्या आत उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कॅब चालक रेलिंगच्या बाहेरच्या बाजूला उभा दिसत आहे. या दोघांमध्ये संभाषण सुरू असतानाच त्यावेळी तिथे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांची व्हॅन पोहोचते. ज्यानंतर ही महिला पोलिसांना पाहताच तिच्या हातातील काही वस्तू समुद्रात फेकते आणि स्वतः उडी मारते. पण कॅब चालक संजय यादव तितक्यात तिचे केस पकडून तिला पडण्यापासून वाचवितो तर पोलीसही तत्काळ पेट्रोलिंग व्हॅनमधून बाहेर पडत महिलेला वाचवितात.