Latest Marathi News
Ganesh J GIF

सुनेत्रा पवार vs करुणा मुंडे! बारामतीचा पेच वाढला; उमेदवारी अर्ज वैध

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6 एप्रिल 2026 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

या वेळी त्यांच्यासमेवत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून त्यासाठी पोटनिवडणूक होत आहे.

दुसरीकडे काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून, आकाश मोरे यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सुनेत्रा पवारांना थेट आव्हान दिले आहे. अर्ज भरण्यापूर्वी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे झाले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात तब्बल 53 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

7 एप्रिल 2026 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. एकूण 55 उमेदवारांनी 68 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 53 अर्ज वैध ठरले, तर 15 अर्ज बाद करण्यात आले. यामध्ये 13 अर्ज दुहेरी असल्यामुळे रद्द करण्यात आले, तर 2 अर्ज तांत्रिक त्रुटींमुळे बाद झाले. या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर अंतिम लढत किती उमेदवारांमध्ये होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या निवडणुकीत एक नाव विशेष चर्चेत आले आहे. करुणा मुंडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत बारामतीतील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक रंगतदार होणार आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार उभा करत ही शक्यता फेटाळली आहे. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत पाठिंबा देण्याची विनंती केली होती. तरीही काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलले आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!