देशात पुन्हा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण मोदींच्या तिसऱ्या पर्वातील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.यामध्ये सहापैकी चार भाजपाचे, एक रिपाइ आणि एक शिवसेना शिंदे गटातील खासदार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एनडीएच्या कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) कोणतेही स्थान मिळालेले नाही. ज्यामुळे या मुद्द्यावरून आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र डागले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज सोमवारी (ता. 10 जून) 25 वर्धापन दिन असून राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच तो दोन्ही गटांकडून साजरा करण्यात येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा अहमदनगरमध्ये साजरा करण्यात येत आहे. याचनिमित्ताने पुण्यातून आज शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, संविधानानेच देश चालणार आहे हे देशाच्या जनतेने दाखवून दिले आहे. एका मतामध्ये काय ताकद असते हे जनतेने सिद्ध करून दाखविले आहे. तुम्ही धनशक्ती म्हणा, कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारले आहे. पन्नास खोके, एकदम ओके हे सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू पडत नाही, हे दाखवून दिले. लोकसभेतील आमचे यश मोठं असलं तरी निश्तितच पक्ष प्रतिनिधींची जबाबदारी आता वाढली आहे.
यावेळी पुण्यातील उद्योगधंद्यांबाबत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, हिंजवडीमधील 35 ते 40 आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. मंत्रिपद मिळाले आहे आता पुण्याला. त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग काँन्ट्रक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा आहे, असे म्हणत सुळेंनी खासदार मोहोळ यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. पुण्याचे भाजपाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांचेही यावेळी कौतुक केले. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी, धंगेकर ॲाक्टोबरमध्ये पुन्हा आमदार होतील, असा विश्वास सुळेंनी व्यक्त केला. आमदार धंगेकर यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मृतांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.आजच मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पाणी तुंबतय, ससूनची बदनामी सुरू आहे. ड्रग्ज येत आहे. त्यामुळे पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करणे आवश्यक आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.