भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅड पडताळणी संदर्भात अर्ज केला आहे. यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत.याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सत्तेच्या सिस्टमवर विश्वास नाही, याचा आत्मचिंतन सर्वोच्च ऑफिसने केलं पाहिजे असे सुळे म्हणाल्या. मला जर संधी मिळाली तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहे की तुमच्याच पक्षाच्या माणसाचा जर EVM वर विश्वास नसेल तर आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाने काय करायचं असे सुळे म्हणाल्या.
विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं खरे आहेत की खोटे याबाबत सरकारने माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या. जर शालेय विद्यार्थ्यांना आपण ही नखे ऐतिहासिक असल्याचे सांगत आहोत. पण कालांतराने ही नखे खोटी निघाली तर सरकारच आपल्याला फसवतेय विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य करू नये. मुलांवर काय संस्कार होतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारने याबाबत खरी माहिती द्यावी असेही त्या म्हणाल्या.
मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यबाबत सुप्रिया सुळे यांनी मौन बाळगले आहे. मला याबाबत माहीत नसल्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केल्याचे बोलले जात आहे. एका माणसाला सुपरमॅन व्हायचंय, मग त्याला देवही व्हायचंय, त्यानंतर तो स्वतःला पाहू लागतो मात्र देव हा विश्व रूप आहे असं मोहन भागवत म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर देण टाळलं आहे. आरएसएसच्या मुखपत्रातून सांगण्यात आले होते की अजित पवारांना बरोबर घेतल्याने पक्षाचे नुकसान झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आर एस एस आणि भारतीय जनता पक्ष हे मित्र आहेत. सातत्याने आरएसएस च्या मुखपत्रातून अशा सूचना येतात यावर आम्ही काय बोलणार? त्यांच्या आघाडीचा हा अंतर्गत प्रश्न असल्याचे सुळे म्हणाल्या.भाजप आणि अजित पवार गटामध्ये सध्या दुरावा आहे. मात्र, ही भाजपची जुनी निती असून सातत्याने मित्र पक्षांवर अप्रत्यक्षपणे टीका कशी करता येईल. त्याबरोबर मित्र पक्षांचे मॉरल डाऊन करणे हे सातत्याने होताना दिसतेय. मात्र, हा त्यांच्या अंतर्गत पक्षाचा प्रश्न असून आपण त्याबाबत बोलणार नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या
आधी महाराष्ट्रात नागपूर ही क्राइम सिटी होती. मात्र आता हा बदल होत चालला असून आता पुणे शहर क्राईम सिटी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला असून शिक्षणाचं माहेर घर असलेले पुणे शहर आज क्राइम सिटी म्हणून उदयास येत असल्याचं दुर्दैव असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितल. याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे सुळे म्हणाल्या. आज महाराष्ट्रात पाऊस बेरोजगारी आणि दुष्काळ असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, सरकारनं पूजा खेडकर यांच्या बाबत सविस्तर माहिती द्यावी, सरकारने यासाठी दोन-तीन आठवडे घ्यावे आणि खरी माहिती जनतेसमोर आणावी असे सुळे म्हणाल्या.अनेक वर्ष महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा होत आहेत. मात्र त्यामध्ये पारदर्शकता नाही असं डेटा सांगतोय. त्यामुळं नीटमध्ये एसआयटी लावावी लागली आहे. त्यामुळं स्पर्धा परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत याबाबत आम्ही पार्लमेंटमध्ये आवाज उठवत असल्याचे सुळे म्हणाल्या.