पुण्यातील बोपदेव घाट येथे गेल्या गुरुवारी रात्री ११ वाजता मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेला आज पाच दिवस झाले तरी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागलेला नाही. पोलिसांची विविध पथके गुन्हेगारांचा शोध घेत आहे. मात्र, गुन्हेगार अद्याप जाळ्यात अडकलेले नाहीत. त्यामुळे पुणे पोलिसांनी तिन्ही गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी त्यांना सरेंडर होण्यास सांगितले आहे. सरेंडर न झाल्यास एन्काउंटर करण्याचा इशारा देखील दिला असल्याची माहिती पुणे पोलिस दलातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याची तयारी देखील पोलिसांनी केली असून गुप्त बातमीदारांमार्फत पोलिस आरोपींची माहिती आहेत. या सोबतच त्यांंचा शोध घेण्यासाठी सिंबा या आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा देखील पोलिस वापर केला जात आहे.
पुण्यातील बोपदेव घाटात टेबल पॉइंट परिसरात एका मुलीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार प्रकरणी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आरोपीला अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, वानवडी, हडपसर, लोणी काळभोर व कोंढवा पोलीसांचे ६० पेक्षा अधिक पथके आरोपींच्या मागावर आहेत. मात्र, अद्याप पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आरोपींना सरेंडर व्हा नाही तर एन्काउंटर करू असा इशारा दिला आहे. तसेच तपास पथकाला आरोपी जिथे सापडतील तिथे सोडू नका, असे आदेश देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे.
पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क लावले कामाला
पुणे पोलिसांनी खबऱ्यांचे नेकवर्क कामाला लावले आहे. ज्या पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क चांगले आहे, अशांना देखील पोलिस अधिकाऱ्यांनी कामाला लावले आहे. तसेच आरोपींना शरणागती पत्करावी अन्यथा एन्काउंटरला सामोरे जावे लागेल, असा संदेश त्यांना देण्यास सांगितला आहे.
आजपासच्या गावात शोध सुरू
पुणे पोलिसांनी जिथे सीसीटीव्ही आहे, त्या ठिकाणचे चित्रण तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच जवळील गावात देखील आरोपींचा शोध घेतला जात आहे. काही गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आरोपींचे रेखचित्र दाखवून विचारपूस केली जात आहे. तसेच आरोपींची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस देखील दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. या सोबतच गावातील एखाद्या मंदिरात किंवा हॉटेलमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती येऊन थांबत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन देखील पोलिसांनी नागरिकांना केले आहे. आरोपी पुण्यातून पळून जाऊ नयेत, यासाठी पुण्याबाहेर जाणाऱ्या सर्व मार्ग, रेल्वे आणि बसेसवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. साध्या वेशातील पोलीस अगदी देशी दारूच्या दुकानात ग्राहक म्हणून उभे आहेत. याशिवाय वेश्याव्यवसाय चालणाऱ्या भागात येणाऱ्या लोकांवरही नजर ठेवण्यात येत आहे.
पुणे पोलिसांनी आता पर्यंत ३ हजार पेक्षा अधिक मोबाइल डेटा तपासला आहे. तसेच या मोबाइलच्या पत्त्यानुसार पोलिसांनी माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे. या सोबतच २५० पेक्षा अधिक आरोपींची चौकशी देखील करण्यात आली आहे.