आईशी फोनवर बोलताना तरुणाने केला आयुष्याचा शेवट; गळ्यावर वार करून तरुणाने स्वतःच्या पोटात खुपसला चाकू
पुण्यातील कर्वेनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईशी बोलत असतानाच एका व्यक्तीने स्वत:च्या गळ्यावर आणि पोटात चाकू खुपसुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कर्वेनगरमधील भोलकरवस्ती येथे ३० सप्टेबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रामविकास जयसिंग चौहान (वय-२६) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अर्णव जवाहिर चौहान यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सत्येंद्र राजपती चौहान याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील सर्व व्यक्ती हे मुळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत. ते पुण्यात पेटिंगची कामे करतात. सत्येंद्र चौहान हा काही वर्षापूर्वी पुण्यात येऊन पेटिंगची कामे करु लागला. त्यानंतर काही तरुणांना तो गावाकडून घेऊन आला. ते त्याच्या हाताखाली काम करतात. रामविकास चौहान हाही त्याच्याकडे पेटिंगचे काम करत होता. त्याबरोबर रामविकास याचा गावाकडून आलेला मित्रही त्यांच्याबरोबर राहून पेटिंगचे काम करत होता. रामविकासचा मित्र सत्येंद्र याच्याकडून २५ हजार रुपये घेऊन पळून गेला होता. त्याला तुम्हीच पळवून लावले, आता ते २५ हजार रुपये तू दे, अशी मागणी सत्येंद्र चौहान रामविकासकडे सतत करत होता. पैसे न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी देऊन त्याला मारहाण देखील केली. तसेच रुमच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप लावून कोंडले होते. वेळोवेळी शारीरीक व मानसिक त्रास देऊन भिती घातली होती.
दरम्यान, रामविकासने ३० सप्टेबर रोजी दुपार च्या सुमारास गावाकडे आपल्या आईला फोन लावला होता. तो आईकडे पैशांची मागणी करीत होता. मात्र, आईनेही इतके पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे निराश झालेल्या रामविकासने घरातील भाजी कापण्याचा चाकूने गळ्यावर वार करून पोटात खुपसुन घेतला. गंभीर जखमी झालेल्या रामविकास याच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, उपचार सुरु असतानाच गुरुवारी त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन सत्येंद्र चौहान याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तरडे तपास करीत आहेत.