
शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत उकळली खंडणी
शिक्षिकेचे अनोखे हनी ट्रॅप पाहून पोलिसही चक्रावले, उकळले लाखो रुपये, असा झाला भंडाफोड
बेंगलोर – एका शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी शिक्षिकेने रचलेल्या हनी ट्रॅपचाही भंडाफोड केला आहे.
पोलीसांनी शिक्षिका श्रीदेवी रुदागी बरोबरच गणेश काळे आणि सागर यांना अटक केली. या तिघांनी ब्लॅकमेल करून तक्रारदाराकडून चार लाख रुपये घेतले, असा आरोप आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगळुरूमध्ये पत्नी आणि तीन मुलीसह तक्रारदार राहत होता. तक्रारदार व्यवसाय करतो. त्याची सर्वात छोटी मुलगी पाच वर्षांची आहे. २०२३ मध्ये तिचा शाळेत प्रवेश घेण्यासाठी तक्रारदार गेला होता. त्यावेळी त्याची शिक्षिका श्रीदेवी रुदागीसोबत ओळख झाली. त्यानंतर श्रीदेवी रुदागी सातत्याने या व्यापाऱ्याच्या संपर्कात राहू लागली. वेगवेगळ्या फोनवरुन या व्यापाऱ्याशी संपर्क साधू लागली, व्हिडीओ कॉल करु लागली. यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांची जवळीक वाढली तेव्हा श्रीदेवीने या व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये उकळले. त्यानंतर जानेवारी महिन्यात १५ लाख रुपयांची मागणी केली. सुरूवातीला चार लाख देणाऱ्या व्यापाऱ्याने नंतर १५ लाख देण्यास नकार दिला. पण काही कारणांनी त्यांनी गुजरातमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी त्याला मुलीच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटची आवश्यकता होती. जेव्हा तो सर्टिफिकेट मिळवण्यासाठी गेला. तेव्हा तिघांनी त्याला अडवले आणि त्याला खाजगी छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवले. आरोपींनी त्याच्याकडून २० लाख रुपयांची मागणी केली. पीडित व्यक्तीने १.९ लाख रुपये ट्रान्सफर केले. पण त्यानंतरही मागण्या सुरूच राहिल्या.
दरम्यान, श्रीदेवी रुदागी हिने अधिक पैशांसाठी त्याला त्रास देणे सुरू ठेवले. यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधला. आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.
पोलिसांनी या प्रकरणात मग श्रीदेवीसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.