
मी माझ्या गाैरीला मारले आहे हे तिच्या आईलाही सांगा
पतीने केली पत्नीची हत्या, प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट, मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि ...
बेंगलोर – एक अतिशय धक्कायादक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील एक दांपत्य कामानिमित्त बेंगलोरला स्थायिक झाले होते. तिथे पती पत्नीत वाद झाल्याने पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. हत्या केल्यावर आरोपी पतीने पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि त्यानंतर महाराष्ट्र गाठल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
गौरी राकेश खेडेकर – सांबरेकर (माहेरचे आडनाव) हिचा निर्घून खून झाला आहे. तर पती राकेश खेडेकर असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलीसांनी पती राकेशला अटक केली आहे. दोन वर्षांपुर्वी सातारा येथील गौरी सांबरेकर हिच्याशी पुण्यातील राकेश खेडेकर याचे लग्न झाले. मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतलेली गौरी ही सुद्धा नोकरीच्या प्रयत्नात होती. तिचा पती राकेश खेडेकर बंगळुरूत उच्च पदावर नोकरीला होता. नोकरीसाठी तो पत्नी गौरीला घेऊन जवळपास एक महिन्यापूर्वी बंगळुरूत शिफ्ट झाला होता. हुलीमावू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दोड्डाकम्मनहल्ली येथे तिसऱ्या मजल्यावर भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. पण त्याठिकाणी दोघात सतत वाद होत होते. क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या वादामुळे राकेश आणि गौरी दोघांनाही मानसिक तणावात होते. गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री जेवताना या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी राकेशला संताप आला आणि त्याचा संयम सुटला. त्याने किचनमधील चाकू घेऊन गौरीला दोन-तीन वेळा भोसकले. यानंतर गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडली अन् तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राकेशने गौरीची हत्या केल्यानंतर सुटकेसमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन टाकले. ती सुटकेत बाथरुममध्ये पोलिसांना सापडली. तत्पुर्वी राकेशने बंगळुरूतून पुण्यात पळ काढला. पोलिसांनी पुण्यातून राकेशला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची चौकशी केली असता चाकू भोसकून गौरीचा खून केल्याची त्याने कबुली दिली. याच दरम्यान राकेशने आपल्या वडिलांनाही फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. राकेशच्या वडिसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्या मुलाने मला फोन केला. आपण पत्नीची हत्या केली. तुम्ही सर्वांना सांगा की, मी तिला मारलं… असं राकेशने आपल्या वडिलांना सांगितले होते. आरोपीने अटकेपूर्वी झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान दोघांनी प्रेमविवाह केला होता पण अखेर त्याचा दुर्देवी अंत झाला आहे.
आरोपी राकेश खेडेकर याने पत्नी गौरीची हत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक अडचण तसेच दोघांमध्ये होणारे वाद यामुळेच राकेश खेडेकर याने पत्नी गौरीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.