
डिलिव्हरीची तारीख सांग, उचलून तुला रूग्णालयात दाखल करु
गावासाठी रस्ता मागणाऱ्या गर्भवती महिलेला भाजपा खासदाराचा विचित्र सल्ला, सार्वजनिक बांधकाम मंत्रीही बरळले म्हणाले...
सिधी – रस्ते, पाणी, वीज या नागरिकांच्या मुलभूत गरजा असतात. आणि या गरजा पुरवण्याची जबाबदारी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची असते. पण आज सुद्धा अनेक नागरिक या सुविधेसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. पण मस्तवाल नेते मात्र बेताल वक्तव्य करताना दिसत आहे. असाच एक भयानक प्रसंग मध्यप्रदेशमध्ये समोर आला आहे.
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील लीला साहू नावाची गर्भवती महिला गेल्या एक वर्षापासून तिच्या गावाला जाणारा रस्ता बांधण्यासाठी संघर्ष करत आहे. आता याच संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. लीला साहू यांनी यापूर्वीही एक व्हिडिओ तयार करत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच रस्त्याची मागणी केली होती. तेव्हाही त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता. आता, लीला साहू या गर्भवती आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा गावातील इतर गर्भवती महिलांसोबत असाच एक व्हिडिओ तयार करून रस्त्याची मागणी केली आहे. पण या भागाचे खासदार डॉ. राजेश मिश्रा यांनी विचित्र आणि महिलांचा अपमान करणारे विधान केले आहे. राजेश मिश्रा म्हणाले की काळजी करण्याचे काय आहे. आमच्याकडे रुग्णवाहिका आहे, रुग्णालय आहे, आशा वर्कर आहे, आम्ही व्यवस्था करू. प्रसूतीची तारीख शक्य आहे, जर तारीख आम्हाला सांगितले तर आम्ही तुला एक आठवडा आधीच उचलून रुग्णालयात दाखल करू. खासदार असेही म्हणाले की ते रस्ते बांधत नाहीत. रस्ते अभियंते आणि कंत्राटदार बनवतात. यासाठी त्यांनी मागील काँग्रेस सरकारला जबाबदार धरले. पीडब्ल्यूडी मंत्री राकेश सिंह यांनीही लीला साहू यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे रस्त्यांची मागणी आहे. जर कोणी सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले तर आम्ही प्रत्येक मागणी मान्य करू का? असे अजब उत्तर दिले आहे. तर साहु या महिलेला पुढे करुन काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान लीला साहू गर्भवती आहे. तिची प्रसूतीची वेळही जवळ आली आहे. लीला गेल्या एक वर्षापासून तिच्या गावात पक्की रस्ता करण्याची मागणी करत आहे, परंतु आतापर्यंत तिची मागणी ऐकली गेलेली नाही. लीला म्हणाली, मी भाजपला मतदान केले, पण रस्त्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.
सध्या या गावात सुमारे १० किलोमीटरपर्यंत रस्ता नाही. लोकांना चालण्यास त्रास होतो. दररोज वाहने अडकतात. अशा परिस्थितीत, राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या जिल्ह्यात ग्रामस्थांना सरकारच्या अंत्योदय योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे नागरिक सरकारवर नाराज आहेत.